Monday, April 18, 2016

सैराट

Tuesday, March 22, 2016

श्रावणमासी हर्षमानसी.....

श्रावणमासी हर्षमानसी, हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे

वरती बघता इंद्रधनुचा, गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले, नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर, पिवळे पिवळे ऊन पडे

उठती वरती जलदांवरती, अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले, सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे, कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती, ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले, पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी, निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी, गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा, श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी, रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा, रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घेऊनि हाती, पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना, हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे, श्रावण महिन्याचे गीत


कवी – बालकवी

Wednesday, February 3, 2016

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी










लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी


कवी: सुरेश भट

Video